रत्नागिरी, ४ फेब्रुवारी २०२४ : पुढील वर्षापासून तीन दिवसांचा क्रीडा महोत्सव करावा. त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. अशा स्पर्धांमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.
रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयममध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या राज्यस्तरीय शुटींगबॉल स्पर्धा २०२४ कालपासून सुरु आहेत. उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी आज स्पर्धास्थळी भेट दिली. यावेळी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, तुषार मठकर आदी उपस्थित होते.
उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, या स्पर्धांसाठी ९५ लाख रुपये दिले आहेत. या दोन दिवसांच्या स्पर्धेमुळे पुढील ३६३ दिवस ऊर्जा मिळणार आहे. पुढील वर्षापासून ३ दिवसांचा क्रीडा महोत्सव करावा. त्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग देखील असावा. थेट परदेशी गुंतवणुकीत देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. यात तुम्हा सर्व एमआयडीसी कर्मचाऱ्यांचे योगदान आहे. दावोसला ३ लाख ७२ हजार कोटींचे सामंजस्य करार झाले. त्यातील निम्म्या गुंतवणुकीला एमआयडीसीने जागाही दिली आहे. अशाच पध्दतीने राज्याला अग्रेसर ठेवण्यासाठी तुमचे योगदान महत्वाचे आहे. कर्मचाऱ्यांसाठी मेडीक्लेम स्कीम, १० वीच्या मुलांना टॅबचे वाटप मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शर्मा यांनी आभार प्रदर्शन करताना अशा स्पर्धांमधून आणि रत्नागिरीत केलेल्या पाहुणचारामुळे उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी मनोबल वाढवल्याचे सांगितले. यावेळी प्रशांत सरोदे, निळकंठ सव्वाशे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर उपस्थितांच्या हस्ते आकाशात फुगे सोडण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर