मुंबई, १० डिसेंबर २०२२ महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रश्नी महाराष्ट्रातल्या खासदारांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दरम्यान हे वातावरण शांत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी करण्याची तयारी दाखविली आहे. त्यासाठी १४ डिसेंबर रोजी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावले असून त्यांच्याशी गृहमंत्री चर्चा करणार आहेत.
- भेट घेतल्याने काहीही फरक पडत नाही
त्यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा एकदा बरळले आहेत. त्यांनी ट्विट करत महाराष्ट्राला डिवचले आहे. विशेष म्हणजे अमित शहा यांची भेट घेऊन काही होणार नाही असे सांगत त्यांनी थेट केंद्रीय नेतृत्वालाच आव्हान दिले आहे. यामुळे पुन्हा हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
- सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड नाही
महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही, महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही. राज्याची कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी मी लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांनाही भेटणार आहे, असे ट्विट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.