महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला दिमाखात सुरुवात

35

पुणे : म्हाळुंगे-बालेवाडी येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही शुक्रवारी दिमाखात सुरुवात झाली. आमदार महेश लांडगे आणि क्रीडा आयुक्त ओमप्रकाश भोपरिया यांनी या कुस्ती स्पर्धेचे उदघाटन केले. यावेळी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती.

यावेळी आमदार संग्राम थोपटे, माजी खासदार नानासाहेब नवले, सिटी कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, उपसंचालक आनंद व्यंकेश्वर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे गटनेते भाऊसाहेब भोईर, अभिजित आंदळकर, तात्यासाहेब कोकणे, सतीश दराडे,‌ अॅड. तुषार पवार, आयोजन समितीचे सदस्य ललित लांडगे, नामदेव मोहिते, विवेक कुलकर्णी, रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे, अर्जुन वीर पुरस्कार विजेते काका पवार, सर्जेराव शिंदे‌ उपस्थित होते.
शुक्रवारी दिवसभरात माती विभागात ५७ किलो गटात झालेल्या कुस्तीत सोलापूरचा आबासाहेब अटकळे, तर ७८ किलो गटात उस्मानाबादच्या हणमंत पुरीने सुवर्णपदक पटकाविले. गेल्या वर्षी या दोघांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. यंदा त्यांनी सुवर्णपदक पटकावले आहे.

त्याचे ५७ व‌ ७९ किलो गटात मॅट व माती विभागातील लढतींना प्रारंभ झाला. कडाडणाऱ्या हलगीला दाद मिळत असताना काटाजोड लढतींनी प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. आपापल्या आखाड्यातील मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षकांसह समर्थक मल्लांची घोषणाबाजी उत्साहात भर घालणारी होती. दुपारच्या विश्रांतीनंतर झालेल्या लढतींनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. ज्येष्ठ मल्ल, प्रशिक्षक यांची मैदानातील उपस्थिती लक्ष वेधणारी होती.