महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या (MOA) आगामी निवडणुकीत मोठा वाद उफाळून आला आहे. MOA ने जाहीर केलेल्या मतदार यादीत खुद्द अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनलाच अपात्र ठरवण्यात आले आहे. अध्यक्षांचीच संघटना मतदान यादीतून वगळल्याने राजकीय आणि क्रीडा वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
एकूण ४७ मान्यताप्राप्त खेळांपैकी केवळ २२ संघटनांनाच मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. यामध्ये कबड्डी आणि कुस्तीसारख्या महत्त्वाच्या संघटनांना डावलण्यात आले असून खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. पात्र संघटनांना हेतुपुरस्सर वगळण्यात आल्याचे आरोप होत आहेत.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी MOA च्या सरचिटणीसांवर वर्चस्व टिकवण्यासाठी अन्य संघटनांचे अधिकार डावलल्याचा आरोप केला आहे. तर महासचिव नामदेव शिरगावकर यांनी कायदेशीर आणि तांत्रिक कारणास्तव काही संघटनांना वगळावे लागले असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
या प्रकारामुळे हजारो खेळाडूंचे भविष्य धोक्यात आले असून वगळलेल्या संघटनांना ‘अनधिकृत’ मानले जाण्याची शक्यता आहे. यामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून खेळाडूंच्या हिताचे रक्षण करावे, अशी मागणी होत आहे. MOA च्या यादीवर आक्षेप नोंदवण्यासाठी २३ तारखेपर्यंतची मुदत देण्यात आली असून निवडणुकीपूर्वीच संघटनेत मोठे राजकारण सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































