Lonavala Minor Girl Rape Case: मावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात रमेश रामदास वाघमारे (रा. तिकोणापेठ, ता. मावळ, जि. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, ही लाजिरवाणी घटना ५ मे २०२५ ते १० मे २०२५ या कालावधीत घडली आहे. संशयित रमेश वाघमारे याने अल्पवयीन पीडितेला आपल्या घरी बोलावून घेतले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या गंभीर प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तातडीने कारवाई करत भारतीय न्याय संहिता कलम ६५ (१) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो कायदा) च्या कलम ४, ८, १२ अन्वये रमेश वाघमारे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने पुन्हा एकदा समाजात अल्पवयीन मुलामुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. दोषीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे













































