मुंबई, ५ नोव्हेंबर २०२२: मुंबईतील एअर इंडियाची इमारत राज्य शासनाला मिळावी यासाठी आता हालचालींना वेग आलाय. एअर इंडियाची तेवीस मजली इमारत खरेदी करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उद्या दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर एक महत्वाची बैठक होणार आहे.
या बैठकीत राज्याचे मुख्य सचिवांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांपुर्वी उप मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केंद्रीय विमान नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडं एअर इंडिया इमारत खरेदीबाबत चर्चा केली होती.
सध्या मंत्रालय आणि अॅनेक्स इमारत मिळून सुद्धा शासकीय कार्यालयांसाठी जागा अपुरी पडते, त्यामुळं मुंबईतील एअर इंडियाची इमारत राज्य सरकारला देण्याची विनंती फडणवीस यांनी केली होती. केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारला प्राधान्य देण्याची मागणी मान्य केलीय.
आता केंद्र सरकारचे अधिकारी आणि आमचे मुख्य सचिव यासंदर्भात पुढील चर्चा करतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेनं पुढील निर्णय घेण्यात येईल, असं उप मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सांगितलंय.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर