महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बारामतीत “कृषिक २०२०” प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन

पुणे : शेतकऱ्यांचे शेतीविषयीचे पारंपारिक ज्ञान अचंबित करणारे आहे. त्यांच्या ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. राज्यातील शेतकऱ्यांना ताकद देऊन महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.
शरदानागर-माळेगाव (ता. बारामती) येथील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आयोजित “कृषिक २०२०” प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, पशु संवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, इस्राईलचे आंतरराष्ट्रीय धोरणकर्ते सल्लागार दूत डॅन अलुफ, सिने अभिनेते अमिर खान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, डॉ सुहास जोशी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना पुढे म्हणाले, कृषिक प्रदर्शन हे प्रात्यक्षिकासह असणारे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून अभिमान वाटावे असे काम झाले आहे. माळरानावर नंदनवन फुलले आहे. जग झपाट्याने बदलत असून विविध क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे. आपला देश हा शेती प्रधान असून शेती हाच आपला मुख्य कणा आहे. देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक नैसर्गिक संसाधनांवर ताण आला आहे. सर्वजण पोटात अन्न जावे म्हणूनच काम करत असतात. या सर्वांना जगविण्याचे काम शेतकरी करतो.
मानव कोणतीही गोष्ट तयार करु शकतो. मात्र पाणी निर्माण करू शकत नाही असे सांगत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,भविष्याचा विचार करून आपल्याला पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल. हे नियोजन झाल्यास शेती समृद्ध होईल. आता माती विना शेती आणि हवे वरील शेतीचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. त्याच प्रमाणे व्हर्टिकल शेतीचेही प्रयोग सुरु आहेत. महाराष्ट्राच्या भूमीत अनेक चमत्कार होत असतात, शेतीच्या नवनवीन प्रयोगांचेही चमत्कार याच भूमीत होतील. महाराष्ट्राचा शेतकरी देशातील शेतकऱ्यांना नक्की दिशा दाखवेल, असा विश्वास व्यक्त करत शेतीसाठी आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट शासन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी खा.शरद पवार म्हणाले, “कृषिक”च्या माध्यमातून दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. जगाची शेती बदलत आहे. त्यामुळे उत्पादकता वाढत आहे. या क्षेत्रात सातत्याने सुधारणा, बदल आणि संशोधन करणे आवश्यक आहे. देशात उपयुक्त संशोधनाला चालना देण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी प्रोत्साहीत करण्याची भूमीका राज्य शासन नक्की घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृषी प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. तेथील विविध शास्त्रज्ञ,तंत्रज्ञ आणि प्रगतशील शेतकरी यांच्याशी संवाद साधला.
ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वाटचाली विषयीची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. सुहास जोशी आणि डॉ. मई नाऊ यांनी “दुष्काळ निवारण कृती आराखडा” या विषयावरील शास्त्रीय संकल्पनेचे सादरीकरण केले. यावेळी डॅन अलुफ यांचे भाषण झाले. सिनेअभिनेते आमीर खान यांच्याशी यावेळी संवाद साधण्यात आला. प्रास्ताविकात राजेंद्र पवार यांनी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वाटचालीची माहिती दिली.
या कार्यक्रमाला देशभरातील कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, विद्यार्थी प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा