स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राची कोरोना लसीकरणात विक्रमी कामगिरी; दिवसभरात ९,३६,००० अधिक नागरिकांचे लसीकरण

मुंबई, १५ ऑगस्ट २०२१: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अजून एक विक्रम नोंदविला. दिवसभरात सायंकाळी सात वाजेपर्यंत ९ लाख ३६ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरणाची आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे शस्त्र असून लसींचा पुरवठा सुरळीत राहिल्यास राज्यात अशाच मोठ्या संख्येने नागरिकांचे लसीकरण होऊ शकते. दिवसाला किमान १० लाख लसीकरणाची क्षमता राज्याची असून आज झालेल्या विक्रमी लसीकरणाने हे सिद्ध झाले आहे. यापुढेही असेच विक्रमी संख्येने लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील असेल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

आज सायंकाळी सात वाजेपर्यंत दिवसभरात ९ लाख ३६ हजार नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. यापूर्वी ३ जुलै रोजी ८ लाख ११ हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी कामगिरी नोंदविली होती त्यात आजच्या लसीकरणाच्या सर्वोच्च संख्येने अजून एक नवा विक्रम केल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा