लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने समसमान जागा लढवाव्यात, काँग्रेसचा प्रस्ताव

मुंबई, दि, १६ मे २०२३ -: नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये, विधानसभा आणि लोकसभेसाठी समिती गठीत करून जागा वाटप करण्याचे ठरले आहे. राज्यात विरोधक महाविकास आघाडीवर टीका करताना महाविकास आघाडीमध्ये एकमत नसल्याची टीका करतात. यावर आता काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी एक प्रस्ताव समोर ठेवला आहे.

लोकसभेसाठी महाविकास आघाडीत समसमान जागा लढवाव्यात याबाबत चर्चा झाली आहे. समसमान जागेच्या फॉर्मुलासाठी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती मिळते. समान जागा वाटप झाल्यास महाविकास आघाडी एकसंध असल्याचा संदेश लोकांमध्ये जाईल अशी काँग्रेसची भूमिका असल्याची माहिती मिळते.

लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशात युती आणि आघाडी मधील कोणते पक्ष किती जागा लढवणार? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे तीन पक्ष आहेत. यांच्यात जागावाटप कसे होणार यावर चर्चा सुरू असतानाच, महा विकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्मुला समोर आला आहे.

२०२४ च्या निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून सामोरे जायचे असेल तर समसमान जागावाटप व्हायला हवे. त्यामुळे तिन्ही पक्षात एकता आणि समानतेचा संदेश लोकांमध्ये जाईल. शिवाय तिन्ही पक्ष एकत्र लढल्याने लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील. अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे समजते.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा