मुंबई, ४ फेब्रुवारी २०२३ : विधानसभेच्या कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागांवर महाविकास आघाडी पोटनिवडणूक लढविण्यावर ठाम आहे; परंतु आघाडीतील कोणता पक्ष कोणती जागा लढविणार यावर एकमत झालेले नाही. याबाबत आज महाविकास आघाडीकडून घोषणा केली जाणार आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक शुक्रवारी मुंबईत झाली. बैठकीला शिवसेना नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे प्रदेशध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. या बैठकीत जागावाटपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यावर एकमत झाले नाही.
कसबा मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगितला आहे. तर चिंचवडच्या जागेवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा दावा आहे. त्यावर कोणता पक्ष लढला तर त्याच्या अधिक फायदा होईल, यावर चर्चा करण्यात आली. कोणत्या पक्षाची मतदारासंघात अधिक ताकद आहे, याविषयीही चाचणी करण्यात आली; मात्र ही बैठक निर्णयाविनाच संपली.
महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते आणि इतर पक्षांशी चर्चा करून आज यासंदर्भात घोषणा केली जाईल, असे बैठकीनंतर सांगण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले म्हणाले, की कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. तीनही पक्षांच्या नेत्यांची चांगली चर्चा झाली. आता आघाडीतील इतर मित्रपक्षांशी आणि वरिष्ठांशी चर्चा करून आज निर्णय घोषित करू, असे सांगण्यात आले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर