महाविकास आघाडीची आज ‘मातोश्री’ वर रणनीती

मुंबई, ११ऑगस्ट २०२२: विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून मविआ मध्ये वाद उफाळल्यामुळं आज मातोश्रीवर नेत्यांमध्ये बैठक होत आहे. शिवसेनेने परस्पर अंबादास दानवेंना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर नियुक्त केल्याने काँग्रेसने आक्षेप नोंदवलाय.

हे पद आम्हाला मिळायला पाहिजे होतं, विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडं आहे तर विधानसभेमध्ये उपसभापतीपद शिवसेनेकडं आहे. त्यामुळं विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पद हे आम्हाला मिळायला पाहिजे, अशी आमची आग्रही भूमिका आहे, दुर्दैवाने शिवसेनेने आम्हाला याबाबत विचारणा देखील केली नाही, अशी नाराजी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. संख्याबळ पाहता जवळपास सर्व समान असल्याने काँग्रेसलाच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देणं आवश्यक आहे याबाबत आज तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार असून याबाबत चर्चा होईल.

यावर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी विचारविनिमय करुनच अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली.

सध्या ७८ सदस्यीय महाराष्ट्र विधानपरिषदेत भाजपचे २४ सदस्य आहेत. शिवसेनेचे १२ तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रत्येकी १०-१० सदस्य आहेत. लोक भारती, पीजेंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांचा प्रत्येकी एक एक सदस्य आहे. तर चार अपक्ष सदस्य आहेत, तर १५ जागा रिक्त आहेत.

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत आणि विरोधी पक्षाची पुढची रणनीती ठरवण्यासाठी मविआ चे नेते आज उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा