महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिवाळीचा प्रकाश पसरवणाऱ्या वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे! महावितरण कंपनीचे संचालक राजेंद्र पवार यांनी नुकतेच आश्वासन दिले आहे की, या कामगारांची दिवाळी नक्कीच आनंदात जाणार आहे. पवार यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे ऐन सणासुदीत कामगारांवरील अन्यायाची भीती दूर झाली आहे.
भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या राज्य वीज कंत्राटी कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत संचालक पवार यांनी हे आश्वासन दिले. या बैठकीत संघाचे अध्यक्ष नीलेश खरात यांच्यासह सचिन मेंगाळे, किरण मिलगीर, शर्मीला पाटील, अमर लोहार आणि निखिल टेकवडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पवार यांनी स्पष्ट केले की, कंपनीच्या पुनर्रचनेमुळे एकही कंत्राटी कामगार कमी केला जाणार नाही; उलट, त्यांच्या जागी १० टक्के अधिक भरती करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर, कंत्राटदार बदलला तरीही कामगार तेच राहतील, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात येतील.
कंत्राटी कामगारांच्या नावांची यादी राज्यातील सर्व विभागांना पाठविण्यात येणार असून औद्योगिक संबंधांचे अधिकारी संजय ढोके यांना तशा सूचना दिल्या आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दिवाळीपूर्वी सर्व कामगारांना चालू आणि थकीत वेतन, मागील फरक रक्कम तसेच बोनस देण्याचे निर्देश संचालक पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. जे कंत्राटदार या कार्यवाहीत दिरंगाई करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांचे नाव काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. राज्यातील ज्यांच्या परिश्रमामुळे दिवाळीचा प्रकाश आहे, त्या कामगारांना न्याय मिळाल्याने त्यांच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे













































