मुंबई, १६ ऑगस्ट २०२०: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता धोनी भारतीय क्रिकेट संघाकडून खेळताना दिसणार नाही. असे असले तरी तो आयपीएल मध्ये दिसणार आहे. चाहत्यांना तो आयपीएलमध्ये खेळताना पाहता येणार आहे.
महेंद्रसिंग धोनीने इंस्टाग्रामवर पोस्ट करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये एमएस धोनीने लिहिले की, ‘तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि समर्थनाबद्दल अनेक धन्यवाद. आज संध्याकाळी ७.२९ नंतर मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्याचे समजले जाईल.’ या पोस्ट सोबत धोनीने एक व्हिडिओही शेअर केला आहे.
३९ वर्षीय एमएस धोनी ने याआधीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु, एकदिवसीय आणि टी -२० सामन्यात तो भारतीय क्रिकेट संघाचा एक भाग राहिला. पण आता धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. काल धोनीने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना सेवानिवृत्तीचे पत्र लिहिले. धोनी क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार राहिला आहे. यासह धोनीच्या नावावर बरेच मोठे विक्रम देखील नोंदविले गेले आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर त्याच्या जगातील अनेक चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याचबरोबर बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीने देखील असे म्हटले की, धोनीची निवृत्ती ही एक युगाची समाप्ती आहे. ह्या सह सचिन तेंडुलकरने देखील धोनीच्या निवृत्तीनंतर ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
याचबरोबर गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले.
विराट कोहलीने देखील ट्वीट करून असे म्हटले की, तुम्ही देशासाठी जे केले आहे ते नेहमीच आठवणीत राहणारे आहे.
एमएस धोनीने २००४ मध्ये बांगलादेशविरूद्ध क्रिकेट कारकीर्द सुरू केली होती. धोनीने आतापर्यंत ९० कसोटी सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने ३५० वन डे आणि ९८ टी -२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटी सामन्यांमध्ये धोनीने ६ शतके केली आहेत, तर एकदिवसीय सामन्यात धोनीच्या नावावर १० शतके आहेत.
विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार
महेंद्रसिंग धोनीला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ओळखले जाते. माही हा सर्वात यशस्वी भारतीय यष्टीरक्षक आहे. त्याने कसोटी सामन्यात २९४, वनडेमध्ये ४४४ आणि टी -२० मध्ये ९१ बळी आपल्या नावे केले आहेत. या व्यतिरिक्त धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली २०११ मध्ये भारताला क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा विश्वविजेता बनविला. २००७ मध्येही धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी -२० विश्वचषक आपल्या नावे केला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी