पुणे-पिंपरीत ‘गृहलक्ष्मी’चा बोलबाला महिलांच्या नावावर १०,००० घरांची खरेदी ७५ कोटींची करबचत

स्त्रीशक्तीचा गौरव करणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी शहरांमध्ये गृहलक्ष्मीच्या नावावर घर खरेदी ही संकल्पना अधिक मजबूत झाली आहे. पुणे शहर सहजिल्हा निबंधक कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या ९ महिन्यांत १०,५९३ घरे महिलांच्या नावावर खरेदी झाली असून, मुद्रांक शुल्कात १ टक्क्याची सवलत मिळाल्यामुळे सुमारे ७५ कोटी ६८ लाख रुपयांची बचत महिलांना झाली आहे.

या वर्षी घर खरेदीत झालेली वाढ लक्षणीय आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रतिसाद दीड पटीने वाढल्याचे दिसून येते. राज्य सरकारने २०२३ मध्ये महिलांच्या नावावर खरेदी केलेले घर १५ वर्षे विकू न शकण्याची अट काढून टाकली आहे, ज्यामुळे घरखरेदीला हवा तसा वेग मिळाला आहे.

सध्या पुणे-मुंबईसारख्या मेट्रो शहरांत सदनिकेच्या खरेदीवर ७ टक्के मुद्रांक शुल्क लागू असते, पण महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास १ टक्क्याची सवलत मिळून फक्त ६ टक्के शुल्क भरावे लागते. याशिवाय, गृहकर्जावर महिलांना मिळणारा कमी व्याजदर देखील या निर्णयाला पाठिंबा देतो.

सहनिबंधक संतोष हिंगाणे यांनी सांगितले की, “महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास केवळ मुद्रांक शुल्कात सवलत मिळत नाही, तर गृहलक्ष्मीला मिळणारा मान मोठा आहे.” नवरात्र आणि दिवाळीच्या काळात सर्वाधिक खरेदी होते, त्यामुळे आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
बांधकाम क्षेत्राकडून महिलांसाठी विशेष ऑफर्स आणि सवलती जाहीर झाल्याने ही संकल्पना स्त्रीसशक्तीकरणास मोठा हातभार देत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे