माजलगावमध्ये ३५ लाखांचा गुटखा पकडला

माजलगाव : नवा मोंढा येथे गुटख्याने भरलेला आयशर टेम्पो खबर्‍यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उप धीक्षक श्रीकांत ढिसले यांनी कारवाई करत गुटख्यासह आयशर व छोटा हत्ती टॅम्पो जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि.४) रोजी रात्री उशिरा करण्यात आली.
जिल्ह्यात गुटखा बंदीला कुठलाही पायबंद नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटख्याची आवक होत आहे. माजलगावमध्ये काही व्यापरी गुटख्याची आवक मोठ्या प्रमाणात करतात. याची कुणकुण पोलीसांना लागली होती. शहरात खबर्‍यांचे नेटवर्क पोलीसांनी उभे केले. रात्री बेरात्री येणार्‍या वाहनावर खबर्‍यांची व पोलीसांची करडी नजर होते. शनिवारी रात्री गस्तीवर असताना येथील पोलिस उपाधीक्षक श्रीकांत ढिसले यांना नवीन मोंढा माजलगाव येथे एका रूममध्ये आयशरमधून गुटखा उतरत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून, त्या ठिकाणी छापा टाकला असता गुटखा उतरवून छोटा महिंद्रा छोटा हत्तीमध्ये पार्सल करण्याचे तयारीत असताना दिसून आला. दरम्यान यावेळी आरोपी रवि सक्राते हा पळून गेला. सदरचा माल हा माजलगाव येथील प्रसिद्ध गुटका किंग अशोक सक्राते यांचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
यावेळी ३० पोती प्रत्येकी ७५ रुपये किमतीचे असा एकूण २२ लाख ५० हजार रुपयांचा गोवा कंपनीचा गुटखा यावेळी मिळून आला. दरम्यान यावेळी पोलिसांनी आयशर टेम्पो अंदाजे किंमत आठ लाख रुपये. व महिंद्रा छोटा हत्ती अंदाजे किंमत चार लाख रुपये असा एकूण ३४ लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अन्न व भेसळ अधिकारी यांना सदर बाबत माहिती दिली आहे. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक श्रीकांत ढिसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा