माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्‍यांची अडवणूक

8

बीड, दि.६जून २०२० : कधी निसर्गामुळे तर कधी सरकारी धोरणांमुळे शेतकरी मेटाकुटीला येत आहे. दुसर्‍या वर्षीचा खरीप हंगाम सुरु झाला तरी पहिल्या गतवर्षीची कापूस, तूर घरात पडून आहे. ती विक्री करण्यासाठी शेतकरी गयावया करत असतांना प्रशासनाकडून मात्र शेतकर्‍यांची गळचेपी केली जात आहे. त्यातच माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या आठ दिवसापासून कापसाच्या गाड्या उभा आहेत. त्यांची मापं होत नसतांना आता नोंदणी केलेल्या तालुक्याबाहेरच्या शेतकर्‍यांचा कापूस खरेदीसाठी बाजार समितीने नकार दिला आहे. त्यामुळे जर कापूस घ्यायचाच नव्हता तर रांगेत उभा करुन आमच्या नोंदी घेतल्याच कशाला असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.

आस्मानी संंकटे पेलून थकलेल्या शेतकर्‍यांना यावर्षी सुल्तानी संकटांचा सामना करावा लागत आहे. नवीन खरीप हंगाम सुरु झाला तरी गतवर्षीच्या हंगामातील कापूस घरात पडून आहे. आधी नोंदणीची अट, मग प्रती शेतकरी चाळीस क्विंटल ती ही चार चाकाच्याच वाहनात आणण्याची अट अशा विविध अटी लादून शेतकरी अडवला जात आहे

या सगळ्या बाबींची पुर्तता करुनही फरदडच्या नावाखाली शेतकर्‍यांचा कापूस नाकारला जात आहे. गेल्या आठ दिवसापासून माजलगाव बाजार समितीच्या आवारात दीडशेपेक्षा अधिक कापसाची वाहने उभी आहेत. तर दोन दिवसात झालेल्या पावसाने वाहनातील कापूस भिजला आहे.

त्यामुळे आता भिजलेला कापूस खरेदी करण्यास ग्रेडर धजावत नाहीत. तर बाजार समितीकडून नियोजनाचा अभाव असल्याने शेतकर्‍यांची ससेहोलपट होत आहे. तालुक्याबाहेरील कापसाची खरेदी बंद माजलगाव तालुक्यात तब्बल सहा खरेदी केंद्र आहेत. तर जिल्ह्यातील वडवणीसह काही तालुक्यात खरेदी केंद्र नाहीत किंवा कमी आहेत. तेव्हा या तालुक्यांसह बाहेर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कापूस विक्रीसाठी नोंद केली होती.

नोंदीच्या नंबरनुसार आता शेतकरी कापूस आणत आहेत. मात्र बाहेरील तालुक्यातील कापूस घेण्यास बाजार समितीने नकार दिला आहे. शेतकर्‍यांनी तहसिलदारांची परवानगी आणणे बंधनकारक केले असून जर कापूस घ्यायचा नव्हता तर नोंदणी का करुन घेतली असा सवाल शेतकरी विचारत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा