गोल पोस्ट राष्ट्रीय ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवर मोठा अपघात : दोन बसच्या धडकेत ३ ठार, २०...

ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवर मोठा अपघात : दोन बसच्या धडकेत ३ ठार, २० जखमी

नोएडा, १८ डिसेंबर २०२२ : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर एक मोठा अपघात झाला आहे. दोन बसमध्ये झालेल्या या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर नोएडामधील नॉलेज पार्कजवळ दोन बस ओव्हरटेक करण्याच्या नादात एकमेकांवर धडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये तीन जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, यातील एमपी ०४ पीए ३२४३ ही बस मध्य प्रदेशातील शिवपुरी येथून दिल्लीला जात होती आणि दुसरी बस यूपी १७ एटी ६४६० प्रतापगडहून आनंद विहारकडे जात होती. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, अपघात स्थळावरील वाहतूक आता सुरळीत सुरु झाली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version