चंद्रपूर, १९ जुलै २०२३ : सिंदेवाही तालुक्यात शॉप शुटर्सच्या साह्याने डार्ट मारुन एका पट्टेदार वाघाला जेरबंद करण्यात आले. महिनाभरापूर्वी नवेगाव, लोनवाही परिसरातील रघुनाथ नारायण गुरनुले यांच्यावर हल्ला करून ठार केले होते. तेव्हापासून हा वाघ परिसरात वावर करीत होता. या मार्गावर ये जा करणाऱ्या नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत होता.
या परिसरातील आणि या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका लक्षात घेता आणि मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता, या नर वाघाला सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र क्र १२८१ मध्ये, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रविकांत खोब्रागडे व शुटर अजय मराठे यांनी डार्ट करुन वाघाला बेशुद्ध केले. त्याला तपासुन काही वेळाने पिंजऱ्यात बंद करण्यात आले.
ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक एम. बी. चोपडे, वनक्षेत्रपाल व्ही.ए. सालकर, ताडोबा अधिकारी कोरपे, रिकेश आयुजा यांच्या उपस्थितीत करण्यात आली. जेरबंद करण्यात आलेला वाघ वय अंदाजे तीन ते चार वर्षे वयाचा आहे. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालय व बचाव केंद्र नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर