महिलांचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याची धमकी देणाऱ्याला अटक

बारामती, दि. ६ जुलै २०२० : राज्यातील अनेक महिलांचे फोटो त्यांच्या फेसबुक प्रोफाईल वरून घेऊन त्याला एडीट करून ते अश्लील फोटो बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस बारामती तालुका पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील आरोपी गणेश खरात हा खोट्या नावाने फेसबुक अकाउंट चालवत असे व फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत महिलांशी गोड बोलून त्यांची ओळख वाढवत असे व त्यांच्या प्रोफाइलवरील फोटो घेऊन ते एडिट करून अश्लील फोटो बनवत असे. त्यानंतर हे फोटो त्या महिलांना दाखवत तू माझ्याशी मैत्री कर, माझ्याशी बोल नाहीतर तुझे अश्लील फोटो मी सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी द्यायचा.

याच्या धमक्यांनी राज्यातील महिला भयभीत झाल्या होत्या. मात्र या प्रकरणी एका महिलेने धाडस करून या घटने प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बारामती तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे स. पो. नि. योगेश लंगुटे, पो.ना. परिमल मानेर, पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव, मंगेश कांबळे, विनोद लोखंडे यांनी तांत्रिक बाबींचा वापर करत संदीप सुखदेव हजारे (वय २९ रा आंबवडे,ता. खटाव,जि. सातारा) यास दहिवडी येथून अटक केली आहे.

या आरोपीवर समर्थ पोलीस स्टेशन पुणे, घारगाव पोलीस स्टेशन जि अहमदनगर, कराड पोलीस स्टेशन जि. सातारा, संगमनेर पोलीस स्टेशन जि. रत्नागिरी या पोलिस ठाण्यात देखील गुन्हे दाखल असून महाराष्ट्रात या आरोपीच्या विरोधात  गुन्हे दाखल असण्याची शक्यता आहे. महिलांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार करावी असे आवाहन बारामती पोलिसांकडून करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा