मंगळवेढा तालुक्यात दोन मटका अड्ड्यांवर पोलिसांचा छापा

13

सोलापूर, दि.२९ मे २०२० : मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील दोन मटका अड्ड्यावर मंगळवेढा पोलिसांनी अचानक छापा मारून १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, मरवडे येथे मटका सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर मंगळवेढयाचे पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बापूसाहेब पवार, गजानन पाटील, सचिन बनकर आदींचे पोलिस पथक २७ मे रोजी मरवडेत दाखल झाले.

त्यावेळेस सकाळी ११.३० वा. अशोक रामचंद्र पडवळे वय ५० रा.मरवडे हा सिध्दू सलगर रा.शरदनगर याच्या सांगण्यावरून मरवडे गावातील एस.टी.स्टँड च्या पाठीमागील रोडवर शाळेसमोर रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून आकडेमोड करून कल्याण नावाचा मटका घेताना त्यास पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम २३० व मटक्याचे साहित्य जप्त केले.

तसेच दुपारी १२.०० वा.आनंदा सुभाष घुले वय ४४ रा.मरवडे हा सिध्दू सलगर रा.शरद नगर याच्या सांगण्यावरून मरवडे गावात डोणज रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून आकडेमोड करून कल्याण नावाचा मटका घेत असताना त्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले.व त्याच्या कडून रोख रक्कम,बजाज डिस्कव्हर दुचाकी व मटक्याचे साहित्य असा एकूण १५ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी अशोक पडवळे, आनंदा घुले व सिध्दू सलगर या तिघांविरूध्द मंगळवेढा पोलिसांत महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार विनोद घोळसगावकर हे करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: