माणगांव : नवनिर्वाचित सरपंचांचा खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते सन्मान

22

माणगांव, ३१ डिसेंबर २०२२ : माणगगांव तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा सत्कार खासदार सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आला. गोरेगांवचे सरपंच जुबेर अब्बासी यांनी गेल्या ५ वर्षाच्या कालावधीत सर्व जातीधर्मातील लोकांना आपलेसे करुन विकास कामे केलीत म्हणून ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले.

निवडणूकीच्या काळात अब्बासी यांनी जो वचननामा प्रसिद्ध केला ती सर्व कामे नजीकच्या काळात शंभर टक्के पुर्णत्वास नेणार, असे आश्वासन देत सध्या काही कारणासाठी महाराष्ट्र राज्यात सत्ता बदल झाला असेल पण जनतेच्या मनात सत्ता बदल झालेला नाही हे माणगांव तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत निदर्शनास आले आहे.मला कोणीतरी नुकताच एकाने प्रश्न विचारला की महाविकास आघाडी म्हणून विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार का ? तर मी हो म्हटले. महाविकास आघाडीचे सरकार गेले असेल मात्र, महाविकास आघाडी अस्तित्वात आहे. उद्या महाराष्ट्रात सत्तेवर येण्याची ताकद महाविकास आघाडीकडे आहे. कारण काही काळापुरता राजकारणात अनेक घडामोडी होत असतात.महाराष्ट्र हा पूरोगामी विचारांचा, समतेचा आहे. सत्ताधारी नेते छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेक महापुरुषांवर बेताल वक्तव्य करताना दिसतात. पण महाराष्ट्रातील १२ कोटी जनता हे पहाते आहे. जनता सुसंस्कृत विचारांची आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत निश्चित सत्ताबदल होईल असे प्रतिपादन खासदार सुनिल तटकरे यांनी नुकतेच गोरेगांवमध्ये केले.

खासदार तटकरे पुढे म्हणाले की, गोरेगांवमध्ये पाच वर्षांपूर्वी आश्वासने दिली होती त्यानुसार, विकासकांची पूर्तता करण्यात आली आहे. त्या वेळची समिकरणे वेगळी होती आताची वेगळी आहेत. २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय महाराष्ट्राच्या पूरोगामी विचाराच्या भूमीत घेतला गेला. सोनिया गांधी यांची अनुमती, उध्दव ठाकरे यांची संमती तर शरद पवार यांच्या व्युहरचनेतून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात यांनी निर्णायक पध्दतीने राजकीय भूमिका घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेल अशी कामे केली. दरम्यान, चीनमधून कोरोनाचा भारतासह, महाराष्ट्रात प्रवेश झाला.आणी मुख्य म्हणजे उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कस लागला. देशात कोरोनाचे असंख्य बळी गेले असताना महाराष्ट्रात मात्र, उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने उत्तमरित्या खबरदारीने अनेक उपाय योजना करून अनेकांचे प्राण वाचवले, कोरोनाच्या संकट काळातच निसर्ग चक्रीवादळाने रायगडात जोरदार तडाखा दिला. दरम्यान, ८३ वर्षीय शरद पवारांनी कोरोनाची भीती न बाळगता पहाणी केली. प्रसंगी महाविकास आघाडी सरकारने त्यावेळी तिप्पट नुकसान भरपाई आपदग्रस्तांना दिली. मात्र, आताचे सरकार ओला दुष्काळ असताना देखील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देत नाही, असे विविध मुद्दे तटकरे यांनी आपल्या मनोगतात मांडले. तसेच २०२४ मध्ये सत्तेत परिवर्तन निश्चित होणार असल्याचे म्हटले आहे.

या प्रसंगी महाविकास आघाडीचे गोरेगांवचे नवनिर्वाचित सरपंच जुबेर अब्बासी, चिंचवलीचे सरपंच नंदू पारावे, देवळीकोंडचे सरपंच मुक्तार बंदरकर, हरकोलचे सरपंच हुर्जुक, पहेलचे सरपंच करिष्मा प्रसाद मांजरे, पन्हळघरचे सरपंच हारिदास शेडगे, कुशेडेचे सरपंच सचिन कदम,दासगांवच्या सरपंच कु.तपस्या जंगम यांच्यासह नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार खासदार तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, गोरेगांवचे सरपंच अब्बासी, श्रीनिवास बेंडखळे, कानुअण्णा उचाटे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर श्रीनिवास बेंडखळे, दिलीप मेहता, विकास गायकवाड, बापु सोनगिरे, कानुअण्णा उचाटे, विवेक दोशी, इम्रान मणियार, प्रभाकर ढेपे, सिकंदर आंबोणकर, कृष्णा तटकरे आदिसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी विकास गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर भारत गोरेगांवकर यांनी सूत्रसंचालन केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रमोद जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा