धर्मवीर चित्रपटाच्या वर्षपूर्ती समारंभात मंगेश देसाईंची मोठी घोषणा

14

मुंबई, २८ डिसेंबर २०२२ : मराठी सिनेमासृष्टी कोणताही विषय अगदी प्रखरपणे आणि ठामपणे मांडू शकते, याचे दाखले मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी वेळोवेळी दिले आहेत. त्याचेच एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ हा मराठी चित्रपट. या चित्रपटाने प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळविला. राजकीय वर्तुळातही या चित्रपटाची भरपूर चर्चा झाली. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या सिनेमातील अभिनेता प्रसाद ओक याचा अभिनय आणि चित्रपटातील संवाद आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. नुकताच धर्मवीर या चित्रपटाचा वर्षापूर्ती कार्यक्रम संपन्न झाला. याचवेळी चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी ‘धर्मवीर २’ ची अधिकृत घोषणा केली.

https://www.instagram.com/p/Cms6zLPP4GI/?igshid=MDM4ZDc5MmU=

धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे अनेक पैलू अद्याप गुलदस्त्यातच आहेत, जे लोकांपर्यंत पोचलेले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या भागात ते पैलू उलगडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे मंगेश देसाई यांनी सांगितले. त्याचप्रमाणे धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. सोशल मीडियावर सॅल्युट करतानाचा फोटो शेअर करीत पुढे पोस्टमध्ये लिहिले, ”थिएटरमध्ये गाजला, ‘ओटीटी’वर गाजला आणि काल ‘झी-मराठी’वर तुमच्या प्रेमामुळे सजला. पुन्हा एकदा अभिनंदनचे आणि कौतुकाचे इतके मेसेजेस आणि कॉल्स आलेत, की असं वाटतं तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना एकदा सॅल्युट करावा…!! असेच प्रेम कायम राहू द्यात.”

धर्मवीर या चित्रपटाच्या पहिल्या भागात दिघे साहेबांचे निधन झाल्याचे दाखवल्यामुळे दुसऱ्या भागात काय दाखवणार, याची उत्सुकता प्रत्येक प्रेक्षकाला लागली आहे. ‘धर्मवीर’ चित्रपटाची क्रेझ चालू असतानाच आता ‘धर्मवीर २’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे सांगितले गेले आहे. प्रसाद ओकच्या उत्कृष्ट अभिनयाबरोबरच प्रसिद्ध दिग्दर्शक, पटकथा, कथा आणि संवाद लेखक प्रवीण तरडे यांचा नजरेतून ‘धर्मवीर २’ दिग्दर्शित होणार आहे. तर निर्माते मंगेश देसाई यांनी सांगितल्याप्रमाणे ‘धर्मवीर २’ हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे