काँग्रेस नेते शशी थरूरांकडून जाहीरनामा प्रसिद्ध ; म्हणाले…

चेन्नई, ७ ऑक्टोबर २०२२: एकीकडे काँग्रेस नेते शशी थरूर अध्यक्ष पदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याच्या अफवा पसरत असतानाच थरूर यांनी अध्यक्ष पदासाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे. आतापर्यंत त्यांनी केरळ, तामिळनाडू आणि इतर राज्यांना भेटी देऊन कामगारांकडून पाठिंबा मागितला आहे.

दरम्यान, गुरुवारी केरळमध्ये खासदार शशी थरूर यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबद्दल आपल्याला पूर्ण आदर असल्याचे स्पष्ट करून थरूर म्हणाले, ही निवडणूक भाजपशी लढण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींवर आधारित मैत्रीपूर्ण स्पर्धा आहे. आपला जाहीरनामा प्रसिद्ध करताना ते म्हणाले, आपल्या पक्षाचे पुनरुज्जीवन झाले पाहिजे. या सोबत कार्यकर्त्यांना सशक्त केले पाहिजे आणि लोकांच्या संपर्कात राहणे हे माझे ध्येय आहे असे सांगत पुढे ते म्हणाले, मला विश्वास आहे की, यामुळे काँग्रेसला मदतच होईल. तसेच येणार्‍या २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशी सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पक्षाच्या कार्यपद्धतीत सुधारणा आवश्यक

पुढे थरूर म्हणाले की, आम्हाला आमच्या पक्षाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची गरज आहे. तरुणांना पक्षात आणून त्यांना खरे अधिकार दिले पाहिजेत. त्याच वेळी, आपण मेहनती आणि दीर्घकाळ सेवा करणाऱ्या कामगारांना अधिक सन्मान दिला पाहिजे. काँग्रेस पक्षाला बूथ स्तरावर मजबूत करण्यासोबतच पक्षाच्या सरचिटणीसांचा योग्य वापर करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, यापूर्वी जाहीरनाम्यात केलेल्या भारताच्या नकाशावरून वाद झाला होता, त्यानंतर थरूर यांनी हा नकाशा बदलून दुसरा नकाशा बनवला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा