मणीपूर प्रकरणातील मुख्य आरोपींचे घर संतप्त महिलांनी जाळले

8

मनिपूर, २१ जुलै २०२३ : मणीपूरमध्ये जमावाकडून दोन महिलांना नग्न करून परेड केल्याचा व्हिडिओ पाहून देशात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये पुन्हा संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी हुइरेम हेरोदास मेतेई याचे घर येथील संतप्त महिलांच्या गटांकडून जाळण्यात आले. तसेच भविष्यात देखील असे घृणास्पद कृत्य होऊ नये यासाठी सरकारने या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी येथील संतप्त महिला गटांकडून करण्यात येत आहे.

मनिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी गुरुवारी जाहीर केले की, या प्रकरणातील मुख्य आरोपीसह आणखी तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. मणिपूर महिला आत्याचार व्हिडिओ प्रकरणी पोलिसांनी थौबल जिल्ह्यातील हुइरेम मेतेई नावाच्या ३२ वर्षीय मुख्य आरोपीला अटक केली आहे. तसेच काल रात्री तिघांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती मणिपूर पोलिसांनी दिली आहे.

मणिपूरमध्ये ही घटना घडून तब्बल ७० दिवस उलटून गेले. तरी देखील यावर कारवाई करण्यात आलेली नव्हती. हा व्हिडिओ व्हायरल होताच, या घटनेचे देशभरात पडसाद उमटले, यानंतर प्रशासनाला जाग येऊन पोलिसांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली. परंतु गुन्हेगारांवर कारवाई करण्यात मोठी दिरंगाई झाल्याने येथील पोलिसांवर देखील टीका होत आहे. या घटनेचे पडसाद मणिपूरसह देशभरात उमटताना दिसत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा