नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी २०२३ :दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सीबीआयकडे एका आठवड्याची मुदत मागितली आहे. सीबीआयने सिसोदिया यांना आज सकाळी अकरा वाजता कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आज सीबीआयसमोर हजर झाले नाहीत. उपमुख्यमंत्र्यांनी यामागचे कारण सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिसोदिया यांनी एजन्सीला पत्र लिहून वेळ मागितला आहे. दिल्लीच्या २०२३-२४ च्या बजेटची तयारी सुरु आहे. यासाठी त्यांना आठवडाभराचा अवधी देण्यात यावा, त्यानंतर जेव्हा बोलावण्यात येईल त्यावेळी ते हजर राहतील, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
- नेमके काय म्हणाले सिसोदिया ?
मनीष सिसोदिया म्हणाले की, मला काल सीबीआयची नोटीस मिळाली होती आणि आजच चौकशीसाठी बोलावले आहे. सध्या मी दिल्लीचे बजेट तयार करण्याच्या कामात व्यस्त आहे. बजेटच्या कामात विलंब होता कामा नये, त्यामुळे प्रत्येक दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. पुढे ते म्हणाले की, मी सीबीआयच्या प्रश्नांपासून पळ काढत नाही, अर्थसंकल्पाच्या कामावर परिणाम होऊ नये, एवढेच माझे म्हणणे आहे. तसेच मी सीबीआयकडे फेब्रुवारी अखेरपर्यंत वेळ मागितला आहे. सीबीआयच्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देईन. मी पळत नाहीये, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.