दौंड : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग योजनेच्या अंतर्गत सुरु झालेला मनमाड – बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग सध्या संथगतीने सुरु असलेल्या कामामुळे चर्चिला जात आहे. दौंड ते कुरकुंभ दरम्यान असलेल्या दहा किलोमीटरच्या अंतराला पार करण्यासाठी किमान अर्धा तासाच्यावर वेळ जात आहे. तर संपूर्णपणे उखडून ठेवलेल्या रस्त्यामुळे दुचाकी,छोट्या चारचाकी, प्रवाशी वाहतूक, एस टी बसेस, अवजड वाहतुकदर अत्यंत त्रासदायक परिस्थितीचा सामना करीत वाहन चालवत आहेत. मात्र याचा किंचितसी देखील दखल तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना, राजकीय पटलावर आपले वर्चस्व सिद्ध करणाऱ्या विकास पुरुषांना घ्यावीशी वाटत नाही. त्यामुळे परिसरातील सर्वसामान्य नागरीक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
दौंड तालुक्याच्या चोहो बाजुला शासनाच्या राज्य केंद्र सरकारच्या विविध योजनेच्या माध्यमातून रस्त्याचे कामे सुरु आहेत. यामध्ये प्रामुख्याने दौंड शहराला जोडणाऱ्या पाटस ते दौंड, कुरकुंभ ते दौंड, सिद्धटेक ते दौंड अश्या विविध मार्गांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी एकाच वेळेस कामे सुरु असल्याने सर्व ठिकाणचे रस्ते उखडून ठेवण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी यंत्रणा अर्धवट कामे करून गायब असल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. मोठ मोठ्या खड्ड्यातून वाहन चालवताना होत असलेली कसरतीमुळे अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे.
बऱ्याच वेळेला रस्ता खराब असल्यामुळे प्रवाशी वाहन दौंड कडील भाडे घेण्यास देखील नकार देत आहेत.
दरम्यान दौंड कुरकुंभ रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाल्याने सामाजिक बांधकाम विभागाने याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक चालवली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे निधी अभावी दुर्लक्ष करीत असल्याच्या चर्चा होत असल्या तरी योग्य कारण समजू शकले नाही.
याबाबत आजवर अनेक निवेदने, विनंती अर्ज करण्यात आले आहेत. तरी देखील यावर सर्वांनी मुग गिळून गप्प राहणे पसंत केले आहे. त्यामुळे याचा प्रत्यक्षात दुष्परिणाम सर्वसामान्य नागरिकांना होत असल्याचे चित्र आहे. या रस्त्यावर अनेक अपघात होऊन अनेक बळी देखील गेले आहेत. एरवी मतदानाच्या प्रक्रियेत दिवस रात्र या रस्त्यावरून जाणाऱ्या पुढाऱ्यांना या मार्गाचा मात्र विसर पडल्याचे दिसून येत आहे. तर अनेक दिवस राजकीय नेते या दिशेला फिरकले नाहीत त्यामुळे त्यांना याबाबत काय घेणे देणे नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरीक देत आहेत.