पुणे महापालिका निवडणुकीसाठी नुकत्याच जाहीर झालेल्या प्रारूप आरक्षण सोडतीमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ४१ प्रभागांपैकी तब्बल ३३ प्रभागांमध्ये खुली जागा (General Seat) फक्त एकच असल्याने अनेक दिग्गज माजी नगरसेवकांचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आरक्षण सोडतीने अनेक प्रभागांमधील राजकीय चित्र स्पष्ट झाले असून, आता उमेदवारीसाठी एकाच पक्षातील इच्छुकांना एकमेकांसमोर प्रचंड संघर्ष करावा लागणार आहे. अनेक प्रभागांमध्ये ज्येष्ठ माजी नगरसेवकांनाही एकमेकांसमोर उभे राहावे लागणार असल्याने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार आहे.
या आरक्षण सोडतीमुळे तीन माजी उपमहापौरांसह अनेक महत्त्वाचे नेते अडचणीत आले आहेत. प्रभाग क्रमांक २ (फुलेनगर नागपूर चाळ) मध्ये अनुसूचित जातीचे महिला आरक्षण पडल्यामुळे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे. तसेच प्रभाग ८ (औंध बोपोडी) आणि प्रभाग २७ (नवीपेठ पर्वती) मध्ये अनुक्रमे माजी उपमहापौर सुनीता वाडेकर आणि सरस्वती शेंडगे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
याव्यतिरिक्त, प्रभाग क्रमांक ३६ (सहकारनगर-पद्मावती) मध्ये ओबीसी महिला आरक्षण आल्याने माजी उपमहापौर आबा बागूल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर प्रभाग २२ (काशेवाडी-डायस प्लॉट) मध्ये अनुसूचित जातीचे महिला आरक्षण पडल्यामुळे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनाही सभागृहात जाण्याच्या इच्छेवर पाणी सोडावे लागण्याची चिन्हे आहेत.
एकूणच, आरक्षण सोडतीमुळे अनेक जुन्या आणि अनुभवी नेत्यांना महापालिका सभागृहापासून दूर राहावे लागण्याची किंवा त्यांना पक्षांतर्गत तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आगामी निवडणुकीत उमेदवारी वाटप हा पक्षांसाठी एक मोठा कसोटीचा विषय ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे










































