मराठा क्रांती मोर्चाची राज्यात होणार दोन आंदोलने व गोलमेज परिषद

मुंबई, १६ सप्टेंबर २०२०: काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षण सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करत मराठा आरक्षण कायद्याला सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिली होती. त्यामुळं घटनापीठाच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नाही. तसेच मराठा आरक्षणा अंतर्गत २०२० आणि २०२१ मध्ये वैद्यकीय प्रवेश प्रकिया आणि नोकरी भरती करता येणार नाही, त्यामुळं मराठा समाजामध्ये पुन्हा एकदा नाराजीचं वातावरण पाहण्यास मिळत आहे . याच पार्श्वभूमीवर नुकतंच मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभरातील आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात आले आहे.

या बैठकीत, होणारे आंदोलन व मोर्चा एकाच दिवशी न घेता वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी घेतले जातील असं ठरवण्यात आलंय. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी आंदोलन होणार नाही. यामध्ये जिल्हानिहाय आंदोलन केलं जाईल. यानुसार येत्या २१ सप्टेंबरला सोलापुरात जिल्हा बंद आणि आंदोलनाची हाक दिली आहे. तर मुंबईत २० सप्टेंबरला ठिकठिकाणी ठिय्या आंदोलनाची शक्यता आहे.

याबरोबरच येत्या १७ तारखेला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन केली जाणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी यापूर्वी जाहीर केल्यानुसार येत्या २३ सप्टेंबरला कोल्हापूरमध्ये राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत राज्यातील पुढील आंदोलनांबाबतचा निर्णय आणि दिशा ठरविण्यात येणार आहेत. या गोलमेज परिषदेत महाराष्ट्रातील जवळपास ५० हून अधिक मराठा संघटना सहभागी होणार आहेत. या गोलमेज परिषदेसाठी राज्यभरातून अनेक तज्ञ मंडळी, विविध मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते, पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा