मराठा क्रांती मोर्चाचं राज्यभर आंदोलन…

पुणे, १७ सप्टेंबर २०२०: “मराठा समाजानं आंदोलन करु नका. मी पुन्हा आवाहन करतो. आधीच्या सरकारची टीम जशीच्या तशी आहे. मराठा समाजासाठी उद्या आणि परवा मोठ्या घोषणा करण्यात येतील.” असं वक्तव्य काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. मात्र आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलक आक्रमक झालेले दिसतायत. आज पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर देखील आंदोलन करण्यात आलं. याच बरोबर कोल्हापुरातून मुंबई-पुण्याला येणारं दूध देखील आंदोलक रोखणार आहेत.

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सरकारबरोबर आहोत. यात कुठलंही राजकारण आणणार नाही. राज्य सरकारने तीन पर्याय विचार करते आहे. अध्यादेश काढणे, फेरविचार याचिका दाखल करणे आणि खंडपीठाकडे जाणे. पहिले दोन पर्याय शासनाला योग्य वाटत नाही. तिसरा पर्याय योग्य वाटतो आहे. यात कुठलंही राजकारण आणणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

आंदोलनाशी संबंधित ताज्या घडामोडी:

• औरंगाबाद:

औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चा आज ढोल बजाव आंदोलन करणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. दोन्ही मंत्र्यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते ढोल वाजवणार आहेत. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी अध्यादेश काढण्याची क्रांती मोर्चाची मागणी आहे.

• कोल्हापूर:

मराठा आरक्षणाला कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय. ठाकरे सरकार कडून देखील स्थगिती उठवण्या बाबत प्रयत्न केले जात आहेत. यासाठी विरोधी पक्ष देखील सहकार्य करण्यास तयार आहेत. परंतु आज राज्यभरात आंदोलक सक्रिय होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्या-मुंबईकडं जाणारा दूध पुरवठा आंदोलकांकडून रोखण्याचा इशारा देण्यात आलाय. यासाठी गोकुळ दूध संघाच्या गोकुळ शिरगाव कार्यालयाबाहेर टॅंकर अडवणार आहेत. गोकुळमधून रोज पुण्यासाठी १५ टँकर, तर मुंबईसाठी ३५ टँकर दूधपुरवठा होतो. हा सर्व दूध पुरवठा रोखण्याचा प्रयत्न आंदोलक करणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गोकुळ संघ कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

• राजेश टोपेंना घेराव घालण्याचा प्रयत्न

जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

• अशोक चव्हाणांच्या बंगल्याजवळ मोठा बंदोबस्त

दुसरीकडे, नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या बंगल्याजवळ मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मराठा आंदोलकांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा