पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द, उदयनराजेंकडून रद्दचा निरोप

7

पुणे, ३० ऑक्टोबर २०२०: कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगित केल्यापासून हे प्रकरण पुन्हा चिघळत चाललं आहे. सध्या राज्यात यावरून ठिकठिकाणी आंदोलनं देखील करण्यात येत आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वात आज पुण्यात मराठा आरक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठा आरक्षणाची पुढची दिशा ठरवण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेला याचिकाकर्ते, अभ्यासक, विधीतज्ज्ञांसह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार होते. परंतु, ही परिषद आता रद्द झाल्याची माहिती मिळत आहे.

आज दुपारी दोन वाजता या परिषदेचं आयोजन पुण्यातील रेसिडेन्सी क्लबमध्ये करण्यात आलं होतं. खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून निरोप देण्यात आला की, आज होणारी मराठा आरक्षण परिषद रद्द करण्यात आली आहे. आरक्षण परिषद अचानक रद्द का करण्यात आली यासंदर्भातील कोणतंही कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

या परिषदेत मराठा आरक्षणाची पुढील लढाई कोणत्या पद्धतीनं लढायची याची दिशा निश्चित करण्यात येणार होती. या परिषदेसाठी खासदार उदयनराजेंसोबत मराठा आरक्षणाचा प्रश्न लावून धरणारे वकील, याचिकाकर्ते, अभ्यासक उपस्थित राहणार होते. मात्र, अचानक या बैठकीसाठी ज्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं, त्या सर्व मान्यवरांना आजची परिषद रद्द करण्यात आल्याचा निरोप पाठवण्यात आला.

मराठा आरक्षण परिषदेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न कुठेतरी सुटेल, ही अपेक्षा विद्यार्थ्यांना होती. पण बैठक रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा