मराठा आरक्षणासाठी आवश्यक असलेल्या कुणबी नोंदींच्या शोधामुळे मोडी लिपी अभ्यासकांना अचानक मोठी मागणी निर्माण झाली आहे. आरक्षण प्रक्रियेत जुन्या कागदपत्रांचा, वह्यांचा आणि दस्तऐवजांचा महत्त्वाचा वाटा असल्याने, मोडी लिपीतील पुरावे तपासण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.
१९५० पूर्वीच्या कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात मोडी लिपीचा वापर झाल्याचे आढळले असून, धुळीने माखलेल्या या नोंदी वाचणे हे मोठे आव्हान ठरत आहे. अस्पष्ट शाई आणि गुंतागुंतीची अक्षरे समजून घेण्यासाठी मोडी लिपी तज्ज्ञांची गरज वाढली आहे. त्यामुळे, एकेकाळी दुर्लक्षित झालेली ही लिपी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.
पुण्यातील अभिलेखागार, तहसील कार्यालये आणि घरोघरी जपून ठेवलेल्या नोंदींमध्ये तब्बल पाच कोटींहून अधिक मोडी लिपीतील दस्तऐवज आढळतात. या पार्श्वभूमीवर मोडी लिपी शिकण्यासाठी कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. प्राध्यापकांच्या माहितीनुसार, आजवर ४०० ते ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी ही लिपी शिकलेली आहे.
या बदलामुळे मोडी लिपीला नवे आयुष्य मिळाले असून, अभ्यासकांसाठी ही परिस्थिती सुवर्णसंधी ठरत आहे. मराठा आरक्षणाच्या चळवळीने इतिहासातील या लिपीला पुनरुज्जीवन देण्याचे मोठे काम केले आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे













































.jpeg?updatedAt=1706263176301)