पुणे, १५ जुलै २०२३ : मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले आहे.ते ७७ वर्षाचे होते. मुंबईचा फौजदार, देऊळ बंद, पानीपत आदी चित्रपटातील अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर त्यांनी अधिराज्य गाजविले होते.तळेगाव दाभाडे येथील बंद खोलीत त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या रुबाबदार व्यक्तीमत्त्वाने मराठी सिनेसृष्टी गाजवणारा कलावंत गमावल्याची भावना मराठी सिनेसृष्टीतून व्यक्त होत आहे.
रवींद्र महाजनी यांना गेल्या काही दिवसांपासून दम्याचा त्रास जाणवत होता. मावळमधील वातावरण मानवल्यामुळे मागील काही महिन्यांपासून ते मावळमध्ये राहायला आले होते. तळेगांव एमआयडीसी परिसरातील आंबी गावात असलेल्या एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये ते भाड्याने राहत होते. फ्लॅटमध्ये ते एकटेच राहत होते. त्यांच्या फ्लॅटमधून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दुर्गंधी येऊ लागल्याने सोसायटीतील नागरिकांना संशय आला. त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांना कळविले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन फ्लॅट उघडण्याचा प्रयत्न केला. पण आतून कोणताच प्रतिसाद न आल्याने अखेर फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलीस आत गेले.
फ्लॅटमध्ये गेले असता पोलिसांना एक मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेहाची पडताळणी केली असता तो मृतदेह प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा असल्याचे आढळून आले. महाजनी यांचा मृत्यू २ ते ३ दिवसांपूर्वी झाला असल्याचा प्राथमिक अंदाज तळेगांव एमआयडीसी पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा मुलगा अभिनेता गश्मिर महाजनी यांना कळविण्यात आली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील रुबाबदार, देखणा नट म्हणून रवींद्र महाजनी यांची ओळख होती. त्यांनी आपल्या रुबाबदार व्यक्तीमत्त्वाच्या जोरावर एककाळ गाजवला. १९७५ ते १९९० या काळात यांनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवून सोडली. त्यांनी साकारलेले चित्रपटही चांगलेच गाजले. मुंबईचा फौजदार, देवता, झुंज, आराम हराम आहे. लक्ष्मी, लक्ष्मीची पावल, गोंधळात गोंधळ आदी चित्रपट चांगलेच गाजले. तर बेलभंडार आणि अपराध मीच केला ही त्यांची नाटकेही गाजली. त्यांनी सत्तेसाठी काहीही या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पाऊल ठेवले होते. २०१५ नंतरही त्यांनी चित्रपटात काम करणे सुरूच ठेवले होते. दुसऱ्या टप्प्यात त्यांनी काय राव तुम्ही, कॅरी ऑन मराठा, देऊळबंद आणि पानीपत आदी सिनेमातून चरित्र नायकाच्या भूमिका साकारल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर