मुंबई, १९ डिसेंबर २०२२ : काही दिवसांपूर्वी ‘सनी’ या मराठी चित्रपटाला स्क्रीन्स उपलब्ध नसल्याने मराठी चित्रपटांची गळचेपी होत आहे, असे मत चित्रपटातील कलाकारांसह निर्मात्यांनी व्यक्त केले. मराठी चित्रपट पाहिलाच गेला नाही तर मराठी चित्रपटांची उत्क्रांती कशी होणार? असा प्रश्नही उपस्थित केला गेला. आणि आता पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली आहे. निर्माता आणि अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या दोघांचा ‘व्हिक्टोरिया’ हा चित्रपट नाईलाजाने पुढे ढकलावा लागला आहे. ‘व्हिक्टोरिया’ हा चित्रपट १६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता; परंतु चित्रपटास फारशा स्क्रीन मिळत नसल्याने चित्रपट पुढे ढकलला गेला आहे.
सध्या भारतभर चर्चा आहे ती ‘अवतार २’ या चित्रपटाची. या हॉलिवूड चित्रपटामुळे ‘व्हिक्टोरिया’ला स्क्रीन उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा इतर चित्रपटांमुळे मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नाहीत, अशी खंत चित्रपटातील अभिनेता पुष्कर जोग यांनी व्यक्त केली आहे. एका पॉडकास्टमध्ये पुष्करने सांगितले, की आपल्या इथे मराठी चित्रपटांना योग्य शोकेसिंग मिळत नाही. मराठी सिनेमांची गळचेपी होते, स्क्रीनसाठी भीक मागावी लागते. ‘व्हिक्टोरिया’च्या ट्रेलरला छान प्रतिसाद मिळाला. १६ तारखेला ‘अवतार २’ होता व सोबत २ मराठी चित्रपट होते. २३ ला ‘सर्कस’ हा हिंदी चित्रपट रिलीज होत आहे. ‘व्हिक्टोरिया’मध्ये खूप क्षमता आहे. मराठी प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘अवतार २’सारखे शोकेसिंग आम्हाला मिळवणं शक्यच नव्हतं. म्हणून मी सिनेमा पुढे ढकलला, असे त्यानी यावेळी सांगितले. ‘व्हिक्टोरिया’ आता पुढील वर्षी १३ जानेवारी रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे. मराठी चित्रपटांची गळचेपी कधी थांबणार? हा प्रश्न अजूनही मराठी कलाकारांसमोर आहे.
मराठी चित्रपटांना केवळ १०० शो मिळतात त्यातून काहीच रिकव्हरी होत नाही. यामुळे आर्थिक संकट ओढवते. प्रचंड नुकसान होते. ‘व्हिक्टोरिया’ला फक्त २५ ते ३० शोच मिळत होते. मग मी हा सिनेमा का लावू? मराठीसाठी एक्सक्लुझिव्ह वेगळे थिएटर सुरू झाले पाहिजेत, असं मला वाटतं, असंही पुष्कर जोग म्हणाला. मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नाहीत ही नेहमीच खंत आहे. त्यातून ‘व्हिक्टोरिया’ या सिनेमामुळे ते पुन्हा अधोरेखित झाले आहे. ‘व्हिक्टोरिया’ हा पुष्कर जोगनिर्मित चौथा चित्रपट असून, या चित्रपटाचे शूटिंग स्काॅटलंड येथे झाले आहे. मराठी प्रेक्षकांसाठी हॉरर आणि थ्रिलर अशी वेगळी कलाकृती घेऊन येणाऱ्या ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटाला इतर चित्रपटांचा फटका बसला आहे. आताच चित्रपट रिलीज करून मी ही सुंदर कलाकृती वाया घालवणार नाही, अशी प्रतिक्रिया पुष्करने दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे