दिवाळी दसऱ्याला झेंडू खाणार भाव अतिवृष्टी व कोरोनाचा परिणाम

16

पुरंदर दि.२४ ऑक्टोबर २०२० : दसरा व दिवाळीमध्ये सजावटीसाठी व पूजेसाठी मानाचा असलेला गोंडा अर्थात झेंडू यावर्षी भाव खाताना दिसतो आहे. झेंडूचे उत्पादन यावर्षी कमी असल्याने झेंडूचे भाव चढेच राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर सध्या शेतक-यांकडून व्यापारी ७० ते १०० रुपये या दराने झेंडू खरेदी करीत आहेत.

पुरंदर तालुक्यात झेंडूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. येथील झेंडूला मुंबई, पुणे, सातारा, तसेच कोकणातूनही मोठी मागणी असते.या भागातून अनेक व्यापारी दसरा दिवाळीसाठी लागणारी झेंडूची फुले खरेदीसाठी येत असतात.या झेंडूच्या पिकावरच येथील शेतकऱ्याची दिवाळी गोड होत असते. या वर्षी मात्र येथील शेतकऱ्यांनी झेंडू उत्पादनाकडे पाठ फिरवल्याची दिसते आहे. दर वर्षी पेक्षा तालुक्यात यावर्षी २० टक्के लोकांनीच झेंडूचे उत्पादन घेतले आसल्याचे दिसते आहे.कोरोनामुळे बाजार पेठ उपलब्ध होईल की नाही याबाबत शेतकऱ्यांच्या मनात असलेली शंका हे सुद्धा झेंडूची लागवड न करण्यापाठीमागचे कारण असल्याचे येथील शेतकऱ्यांनी म्हटले आहे. तर ज्या लोकांनी झेंडूची लागवड केली होती त्यांनाही परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. सततच्या पावसाने झेंडूची फुले खराब झाली आहेत. तर झाडे सुद्धा खराब झाली आहेत. त्यामुळे दसऱ्याला थोडी फार फुले मिळणार असली तरी दिवाळीला मात्र झेंडू खूपच कमी मिळणार आहे. त्यामुळे एकीकडे झेंडू भाव खाणार असं दिसतंय तर दुसरीकडे झेंडू भाव खात असताना शेतकऱ्याकडे विक्रीसाठी फुले असणार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी झेंडूचा हातभार यावर्षी असणार नाही.

याबाबत कृषी सेवक अनिता शिंदे म्हणाल्या की, येथील वाल्हा, दौंडज,पिंगोरी,जेजुरी आणी सासवड परिसरात ही दरवर्षी झेंडूचे उत्पादन मोठ्या प्रनामात घेतले जाते. परंतु यावर्षी शेतकऱ्यांनी झेंडूच्या उत्पादनाकडे पाठ फिरवल्याचे दिसते आहे.त्यामुळे या भागातून उत्पादन कमी होणार आहे.याचा परिणाम म्हणून झेंडूचे भाव वाढू शकतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे