मूल होत नसल्याच्या कारणावरून विवाहीतेचा छ्ळ

इंदापूर, दि. ३० जून २०२०: मूल होत नसल्याच्या कारणावरून विवाहीतेचा अमानुषपणे छळ व अघोरी प्रथेने उपचार केल्याप्रकरणी महिलेचा नवरा, सासू सासरा यांच्यासह पाच जणांविरोधात भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोमल दिलीप कदम रा. वार्ड क्रं२ भिगवण (ता. इंदापूर )या विवाहीतेच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती नितीन दिलीप कदम,सासरे दिलीप तुकाराम कदम, सासू सिमा दिलीप कदम, सोलनकर महिला (पुर्ण नाव माहित नाही) रा.भिगवण वॉर्ड नं २, स्वामी चिंचोली (ता.दौंड) येथील एक महिला पुर्ण नाव माहित नाही अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, २७ नोव्हेंबर २०१९ ते २७ जुलै २०२० पर्यंतच्या या तीन वर्षांच्या कालावधीत कोमल हीस मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून पती, सासू,सासरे यांनी वारंवार शारीरीक व मानसिक त्रास देऊन शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहाण करून छळ केला. त्याचप्रमाणे इतर दोन्ही महिला आरोपींनी आपल्यामध्ये अलौकिक व अतेंद्रीय शक्ती आहे असे भासवून फिर्यादीच्या मनात भिती बसवून त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागली नाहीस तर तुला मुल होणार नाही, अशी भिती दाखविली तसेच फिर्यादीच्या डोक्याच्या केसाच्या दोन बटा अमानुषपणे उपटल्या.

यामुळे त्रासाला कंटाळून कोमल हीने सर्वांविरोधात फिर्याद दाखल केली त्यानुसार महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोना यांना प्रतिबंध घालणेबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ प्रमाणे पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अविनाश काळे करीत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा