बेंदूर सणामुळे बैलांच्या सजावटीच्या साहित्यांनी फुलल्या बाजारपेठा

पुरंदर, दि. ३ जुलै २०२०: पुरंदर तालुक्याच्या दक्षिण भागाकडील गावांमधून आषाढी अमावस्येला बेंदूर सण साजरा होत असतो यावर्षी शनिवारी हा सण साजरा होणार आहे या सणानिमित्त बैलांच्या सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी केले जाते त्यामुळे या साहित्याच्या विक्रीसाठी नितीन अनेक दुकाने सजली आहे.

बेंदूर म्हणजे शेतकऱ्याच्या सर्जा राजाचा सण. आपल्या शेतामध्ये वर्षभर राबणाऱ्या या सर्जा-राजाच् कौतुक करावं म्हणून बळीराजा हा सण साजरा करत असतो. हा सण कर्नाटकी बेंदूर म्हणून ओळखला जातो. कारण महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पुरंदर तालुक्यातील नीरा नदीकाठच्या काही गावांमधून हा सण साजरा केला जातो.

पुरंदर तालुक्यातील दक्षिणेकडील गावांमधून म्हणजेच नीरा नदीकाठच्या वीर, जेऊर, मांडकी, निरा, गुळूंचे, परिंचे या गावांमधून हा सण साजरा केला जातो. यावेळी बैलांना सजवलं जातं. बैलांच्या सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. त्यामुळे बाजारपेठेत बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या सामानांची खरेदीसाठी शेतकरी गर्दी करताना दिसत आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांनी दुकाने फुलून गेली आहेत.

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बळीराजाकडे पैसा तर कमी आहेतच पण कोरोनामुळे आलेल्या टंचाईमुळे बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य सुद्धा महागले आहे.त्यामुळे थोडी फार काटकसर करीत बळीराजा आपल्या लाडक्या सर्जा-राजाच्या सजावटीचे सामान खरेदी करताना दिसतो आहे. बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्यामध्ये यावर्षी दहा ते वीस टक्के वाढ झाल्याचे येथील व्यापारी सांगतायत. शेतकरी मात्र सजावटीचे साहित्य महागले असले तरी आपल्या सर्जा राजासाठी काटकसर करत साध्या पद्धतीने हा सण साजरा करणार असल्याचे म्हणतो आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा