कोल्हापूरमधील कबनूर येथे फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; तर एकाचा मृत्यू

कोल्हापूर, २३ मे २०२३ : कबनूर महात्मा फुलेनगर मधील अमन फटाका मार्टच्या गोडावूनमध्ये भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये मालक परवेझ मुजावर (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. घटना स्थळी शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला आहे.

कबनूर-कोल्हापूर रोडवर फुलेनगर येथे मुजावर यांचा फटाके तयार करण्याचा कारखाना आहे. नेहमीप्रमाणे मुजावर सकाळी फटाका गोडावूनमध्ये साफसफाईसाठी गेले होते. गोडावूनचे दार उघडून ते आत गेले. दरम्यान त्यांना काही कळण्याच्या आतच स्फोट झाला. त्यांना बाहेर पडण्यासही वेळ मिळाला नाही. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

स्फोटांची तीव्रता इतकी मोठी होती की सगळा परिसर हादरुन गेला. स्फोटांचा आवाज सुमारे दोन किलोमीटर इतका दूर गेला होता. गोडावूनच्या भिंती जमीनदोस्त झाल्या. तर गोडवूनच्या छताचे पत्रे दुरवर उडून गेले होते. परवेझचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा