ठाणे, १९ एप्रिल २०२३: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वंडर मॉलजवळील ओरियन बिझनेस पार्कमध्ये काल रात्री भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की ती रात्रभर धगधगत राहिली. ही आग विझवण्यासाठी सुमारे १० तास लागले. या भीषण आगीत संपूर्ण ओरियन बिझनेस पार्क जळून खाक झाला. या आगीतून १०० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये कोणाचाही मृत्यू झाला नाही ही दिलासादायक बाब आहे.
मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही आग लागुन हळूहळू ती पहिल्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावर पोहोचली. अग्निशमन दलाच्या जवानांनी कारवाई केली आणि बिझनेस पार्कमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे १०० जणांना सुखरूप बाहेर काढले आणि सुदैवाने कोणालाही जीव गमवावा लागला नाही.
आगीचे प्राथमिक कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे. आग एवढी प्रचंड होती की त्याच्या ज्वाळा एक किलोमीटरर्यंत दिसत होत्या. त्यामुळे स्थानिक नागरिक घाबरले. आगीमुळे उद्यानाच्या परिसरात उष्णता वाढली. पार्किंगमधील कार आणि मोटारसायकल जळल्या, तसेच कारचा स्फोट झाला. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराट वाढली होती.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड