मावळ तालुक्यातील राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पुणे पीपल्स बँकेचे विद्यमान संचालक बबनराव भेगडे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भेगडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासोबतच राहण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.
अजित पवार यांनी स्वतः भेगडे आणि त्यांच्या समर्थकांना पुण्यात बोलावून सविस्तर चर्चा केली. या बैठकीत मागील काळात झालेले मतभेद आणि गैरसमज दूर करण्यात आले. भेगडे यांनीही आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडलेला नाही आणि यापुढेही याच पक्षात काम करत राहणार असल्याचे स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी काही गैरसमजांमुळे भेगडे पक्षाच्या कामापासून दूर झाले होते, मात्र त्यांनी पक्ष सोडला नव्हता. अजित पवार यांनी त्यांना पक्षासाठी पुन्हा सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले आहे. भेगडे यांनीही आता पुन्हा एकदा पक्षाच्या कामासाठी जोमाने उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक घारे, बबनराव भोंगाडे, उपसभापती नामदेव शेलार, पीएमआरडीए सदस्य संतोष भेगडे, खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुनील दाभाडे, माजी सरपंच ज्ञानेश्वर मराठे, चंद्रकांत दहिभाते, बाळासाहेब भदे, लहू सावळे, रवींद्र घारे, आयुब सिकिलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अॅड. साहेबराव टकले, शंकर वाजे, अॅड. ज्ञानेश्वर दाभोळे, रघुनाथ मालपोटे, नगरसेवक अभिजीत काळोखे, प्रवीण काळोखे, जयेश मोरे, नवनाथ मालपोटे, विशाल मराठे, तानाजी दाभाडे, विठ्ठल जाधव, शरद भोंगाडे, राहुल पारगे, माजी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रूपाली दाभाडे यांसह अनेक प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या घडामोडीमुळे मावळच्या राजकारणात अजित पवार गटाची ताकद आणखी वाढली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































