१ मे कामगार जागतिक कामगार दिन

इंदापूर, १ मे २०२० : १ मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून ओळखला जातो. १८८६ साली याच दिवशी सशस्त्र शासन, गब्बर कारखानदार, हुजरी वृत्तपत्रे यांच्या हिंसक शक्तीवर; अहिंसक, विधायक, लोकशाही मार्गाने मात करून, प्राणाचे मूल्य देऊन कामगारवर्गाने शेवटी माणूस म्हणून जगण्याचा आपला मानवी हक्क मिळवला होता.

आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळीच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८० हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; तसेच अन्य कित्येक देशांमध्येही अनधिकृतरित्या हा दिवस साजरा केला जातो.

औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यात, १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांची निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला केवळ ८ तास काम असावे, असा ठराव घेतला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व १८९१ पासून १ मे हा कामगारदिन पाळण्यात येऊ लागला.

भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला. ‘लेबर किसान पार्टी हिंदुस्थान’ या संघटनेने हा दिवस पाळला होता. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता. जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी १ मे हा दिवस जगभरात कामगारदिन म्हणून पाळला गेला. या दिवशी जगातील ८० देशांमध्ये सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते. कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कामगार संघटना तसेच उद्योजक व सरकारतर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कामगारांचा गौरव करण्यात येतो.
इंदापूर तालुक्यात लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत, आसपासच्या परिसरातील शेकडो कामगार कार्यरत आहेत. मात्र येथील कामगारांना कायम न करता त्यांना कंत्राट पद्धतीने राबविले जाते. कंपन्यांचा मनमानी कारभार आणि स्थानिक धनदांडग्या कंत्रादारांकडून होणारी हेळसांड यामुळे येथील कामगार वर्ग नाराज असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. येथील कामगारांना योग्य न्याय मिळावा एवढीच अपेक्षा व्यक्त होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा