लातूर, दि. ८मे २०२०: उदगीर शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढणार नाही, यासाठी यंत्रणांनी सजग राहून युद्ध पातळीवर सर्व उपाय योजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.
लातूर जिल्ह्यातील पर्यावरण,पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन,संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांचेसह अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ढगे, तहसीलदार, श मुंडे, नपचे मुख्याधिकारी यांच्यासह उदगीरशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कॉन्फरन्सिंग द्वारे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी देशमुख म्हणाले की, नियम तयार होत आहेत,आदेश निघत आहेत, परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही याचा आढावा यापुढे घेतला जावा, राज्यमंत्री संजय बनसोडे स्वतः या परिस्थितीवर लक्ष ठेवून राहतील.
तसेच पालिका कर्मचारी, महसूल व शासनाच्या इतर विभागातील कर्मचारी, पोलिस यांची एकत्रित संयुक्त पथके नियुक्त करावीत. जिल्हाधिकाऱ्यांनी पथकांची संख्या आणि त्यातील सदस्य संख्या शहराच्या क्षमतेनुसार ठरवावी. सर्व पथकांना शहराचे मुख्य मार्ग, प्रभाग, अंतर्गत रहदारीचे रस्ते विभागून द्यावेत, ज्यामुळे रस्त्यावर पथकांची गर्दी होणार नाही.
त्याचप्रमाणे पथकांनी फिजकल डिस्टन्सिंग पालन करावे, शासन, प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना व इतर निर्देशांचे पालन करावे, सूचनांचे पालन होते की नाही हे तपासण्यासाठी एक वेगळी यंत्रणा तयार करावी, काही फिरती पोलीस पथकेही नेमवीत, जी मुख्य रस्त्यावर सतत सूचना करीत राहतील, अशा सुचनाही पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी केल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: