मुंबई, १२ ऑक्टोबर २०२० : मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीतल्या वृक्षतोडीविरोधात सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधातले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय तसंच आरे इथली कारशेड आता कांजूरमार्ग इथं हलवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितलं. कांजूरमार्ग इथली जमीन सरकारी असल्यामुळे ती शुन्य पैशात मेट्रोसाठी उपलब्ध होणार आहे. आरे इथं यापूर्वी यासाठी साधारण शंभर कोटीं रुपयांचं क्राँक्रीटीकरण, भराव, रँम्पचं आदी काम करण्यात आलं आहे, हा पैसा वाया जाऊ नये, हे लक्षात घेऊन त्याचा वापर भविष्यात केला जाईल असं ते म्हणाले.
आरे वसाहतीतील ६०० हेक्टर जागा राज्य सरकारनं जंगल म्हणून यापूर्वीच घोषित केली असून त्यात आणखी २०० हेक्टरची भर घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच सध्या आरे वसाहतीत असलेले गोठे, आदिवासींच्या घरांना किंचितही धक्का लागणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
केंद्र सरकारनं नुकत्याच केलेल्या तीन कृषी कायद्यांबाबत राज्यातल्या शेतकरी संघटनांशी चर्चा सुरू आहे. यातील ज्याबाबी चांगल्या आहेत त्या स्वीकारल्या जातील. मात्र, या कायद्यांबाबत काही आक्षेपही आहेत. त्यामुळे चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: