कल्याण, दि. २६ जुलै २०२०: कल्याणच्या खडकपाडा परिसरातील अटाळी गावात अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. अंगात भूत असल्याच्या कारणावरून आई आणि मुलाची बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत या मायलेकरांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे कोरोनामूळे सर्वजण हवालदिल झाले असताना अटाळी गावात घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडवून दिली आहे.
याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी एका मांत्रिकासह ३ जणांना अटक केली आहे. यात एका अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. चंदूबाई शिवराम तरे आणि पंढरीनाथ शिवराम तरे अशी या प्रकारात मृत्युमुखी झालेल्या व्यक्तींची नावं आहेत.
अटाळी गावातील तथाकथित मांत्रिक सुरेंद्र पाटील याने चंदुबाई आणि पंढरीनाथ यांच्या अंगात भूत असल्याचे पंढरीनाथ तरे यांच्या पत्नी आणि पुतणीला सांगितले. हे भूत बाहेर काढण्यासाठी राहत्या घरात दोघांच्याही अंगावर हळद टाकून नातेवाईकांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तर तब्बल ४ तासांहून अधिक काळ हा सर्व प्रकार सुरू होता. ज्यामध्ये चंदूबाई आणि पंढरीनाथ या दोघांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान या सर्व भयानक कृत्याप्रकरणी देवेंद्र भोईर (पंढरीनाथ यांचा भाचा) यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी भा.द.वि. कलम ३०२, ३४ सह अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३ च्या कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करत मांत्रिकासह पंढरीनाथ तरे यांच्या पुतण्या-पुतणीला अटक करत एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे. ही घटना का घडली या मध्ये काही घातपाताचा प्रयत्न आहे का? किंवा कौटूंबिक गोष्टींमधून ही घटना घडली आहे का? अशा सर्व प्रश्नांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे