बारामती, दि. ६ जून २०२०: बारामतीचे धडाकेबाज अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना यांची कोल्हापूर येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी मिलिंद मोहिते यांची नियुक्ती झाली आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना हे कोल्हापूर येथील भारत राखीव बटालियनचे समादेशक म्हणून नियुक्त झाले आहेत. तर बारामतीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या जागी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जयंत मीना यांच्या कारकिर्दीत शेकडोहून अधिक अवैध धंद्यावर क्राईम ब्रांचच्या पथकाने कारवाईचा बडगा उचलून अवैध धंदेवाल्यांना चांगलीच धडकी भरवली होती. अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी बदलीचा आदेश दिला होता. त्यानुसार बदलीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मिलिंद मोहिते यांनी बारामतीत प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे.
या अगोदर मोहिते हे भोर उपविभागीय पोलीस अधिकारी व राज्य महामार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक, सोलापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, स्वारगेटचे पोलीस उपायुक्त म्हणून देखील त्यांनी कामकाज पाहिलेले आहे.
तर जयंत मीना यांच्या कालावधीत क्राईम ब्रांच पथकाने गुटखा, दारू, मटका, जुगार, वाळूमाफिया, कत्तलखाने, सावकारी अशा अनेक अवैध धंद्यावाल्यांना कारवाईचा दणका देत करोडो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आपली कारकीर्द गाजवली होती, यामुळे अवैध धंदेवाल्यांवर जयंत मीना यांचा वचक कायम होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी