गोल पोस्ट राष्ट्रीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एमआयएम सक्रिय होणार पश्चिम महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणीला वेग

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एमआयएम सक्रिय होणार पश्चिम महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणीला वेग

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याची घोषणा केली आहे. यामध्ये महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांचा समावेश आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या आदेशानुसार, एमआयएमने पश्चिम महाराष्ट्रात आपली संघटनात्मक बांधणी वेगाने सुरू केली आहे.

या संदर्भात, पक्षाचे प्रदेश सहसचिव शफिउल्ला काझी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ५ सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे झालेल्या बैठकीत ओवैसी यांनी महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना स्थानिक निवडणुकांत पूर्ण ताकदीने उतरण्याचे निर्देश दिल्याचे काझी यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी शफिउल्ला काझी यांची पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून नियुक्ती केली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये काम सुरू झाले आहे.

यावेळी बोलताना शफिउल्ला काझी म्हणाले की, “महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत अल्पसंख्याक, ओबीसी, आदिवासी आणि वंचित समाजासाठी एमआयएम एक खंबीर पर्याय म्हणून पुढे येत आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली गेल्या ७५ वर्षांपासून या समाजांची मते घेतली गेली, परंतु त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले.” या पार्श्वभूमीवर, स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये एमआयएमचा सहभाग महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version