नाशिक, ६ मे २०२३: जिल्हा परिषदेमध्ये ई-ऑफीस प्रणालीच्या हालचालींना जोर आला असून, लवकरच याबाबतची प्रणाली विकसित होऊन सर्व कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहे. त्यामुळे आता लवकरच नाशिक जिल्हा परिषद कागदविरहीत असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल टाकत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिल पासून ‘ई ऑफिस’ प्रणाली सुरू करण्यात येईल,
या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जिल्हा प्रशासन कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, नगरविकास, पोलीस, आरोग्य अशा सर्वच कार्यालयांमध्ये आता ई-ऑफीस प्रणाली अस्तित्वात येणार आहे. सध्या महाराष्ट्र सरकारकडून ४५० सेवा ऑनलाईन स्वरूपात दिल्या जात आहेत. आता संपूर्ण कामकाज डिजिटल होणार आहे. त्यासाठी जि.प.मध्ये पेपरलेस काम बघायला मिळणार आहे.
ऑनलाईन प्रणालीमध्ये कामे लवकर होतात मात्र, ते तंत्रज्ञान शिकण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असणार आहे. या ई-ऑफीसच्या माध्यमातून या मिनी मंत्रालयात पेपरविरहीत कामकाज सुरू होईल. याचा डेटा क्लाउड या स्टोरेजवर साठवला जाणार असून त्यासाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडून वेगाने कार्यवाही केली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर