पैठणमध्ये वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक सुरु करणार, मंत्री संदिपान भुमरे यांची माहिती

औरंगाबाद, ३० ऑक्टोबर २०२२ : पैठण येथे दिवाळीनिमित्त औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्याकडून स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मठातील संत-महंतांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलतांना भुमरे यांनी वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक सुरु करणार असल्याची माहिती दिली. यामुळे वारकऱ्यांसाठी सुरू होणारी ही राज्यातील पहिलीच स्वतंत्र बँक ठरणार आहे.

राज्यात सत्ताबदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भुमरे यांना पुन्हा एकदा मंत्रिपदी संधी मिळाली. यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा घेऊन मोठी शक्ती प्रदर्शन केले होते. आता दिवाळीनिमित्त आपल्या निवासस्थानी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित केला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला अनेक मठातील संत-महंतांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. दरम्यान यावेळी बोलतांना भुमरे यांनी वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक सुरु करण्याबाबत इच्छा व्यक्त केली. त्याचबरोबर यासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी आपण तयार असल्याचे भुमरे यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना भुमरे म्हणाले की, वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक असायला पाहिजे. जर सर्व संत म्हणतांनी पुढाकार घेतला तर, यासाठी जी काही मदत लागेल ती करायला आपण तयार आहे. वारकऱ्यांसाठी जर स्वतंत्र बँक असेल तर वेळोवेळी मदत होईल. त्यामुळे वारकऱ्यांना कधीच कुणासमोर हात पसरावे लागणार नाही. ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी वारकऱ्यांची हक्काची बँक उपलब्ध असेल. त्यामुळे सर्वच संत-महंतांसह वारकऱ्यांनी पुढाकार घ्यावा यासाठी माझ्याकडून जी काही मदत लागेल ती आपण करण्यास तयार असल्याचे भुमरे यांनी सांगितले. भुमरे यांनी केलेल्या या घोषणेचे उपस्थित वारकऱ्यांनी स्वागत केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा