‘मिर्झापुर’ फेम शाहनवाझ प्रधान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई, १८ फेब्रुवारी २०२३ :बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणारे अभिनेते शाहनवाझ प्रधान यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. त्यांनी ‘मिर्झापूर’ वेब सीरिजमध्ये ‘गुड्डू भैया’ (अली फजल) च्या सासऱ्याची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ते एका कार्यक्रमात असताना त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईतील एका रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शाहनवाज यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, मिर्झापूरमधील त्यांचे सहलकाकार राजेश तेलंग यांनी या वृत्ताची पुष्टी केली. त्यांनी शाहनवाझ यांचा फोटो ट्विटरवर शेअर करत शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, शाहनवाझ भाई यांना शेवटचा सलाम, किती अप्रतिम माणूस आणि किती अप्रतिम अभिनेते होते. मिर्झापूर दरम्यान मी तुमच्यासोबत किती चांगला वेळ घालवला होता. या घटनेवर विश्वास बसत नाही आहे. राजेश यांच्या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी शाहनवाझ यांना श्रद्धांजली अर्पण केली.

  • ‘श्री कृष्णा’ मालिकेत साकारली होती ‘नंद बाबा’ ची भूमिका

शाहनवाज प्रधान यांनी ‘जन से जनतंत्र’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘श्री कृष्णा’ या लोकप्रिय मालिकेत नंद बाबा ही भूमिका साकारली. या मालिकेच्या माध्यमातून ते घराघरांत पोहेचले. त्यानंतर ‘देख भाई देख’, ‘अलिफ लैला’, ‘ब्योमकेश बख्शी’, ‘बंधन सात जन्मों का’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केले. तसेच ‘प्यार कोई खेल नहीं’, ‘फँटम’ आणि ‘रईस’ सारख्या सिनेमांत देखील ते झळकले आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा