ई-केवायसी करा, अन्यथा ‘बोगस’ रेशनकार्डधारकांच्या यादीत नाव; पुणे जिल्ह्यात २७% लाभार्थी अजूनही वंचित!

7 Lakh Ration Card Holders in Pune at Risk of Losing Benefits
E-KYC करा;

7 Lakh Ration Card Holders in Pune at Risk of Losing Benefits: जर तुम्ही अजूनही तुमच्या रेशनकार्डचे ई-केवायसी केले नसेल, तर सावधान! कारण, वारंवार आवाहन करूनही ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शिधापत्रिकाधारकांची नावे आता ‘बोगस’ रेशनकार्डधारकांच्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांना धान्याच्या लाभापासून वंचित राहावे लागेल.

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७३% लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केले आहे, तर अजूनही २७% म्हणजेच ७ लाख १३ हजार १९० नागरिकांचे ई-केवायसी प्रलंबित आहे. राज्य सरकारने ई-केवायसीसाठी ३१ मे ही अंतिम मुदत दिली होती, जी आता संपली आहे. यापुढे कोणतीही अधिकृत मुदतवाढ दिलेली नाही आणि आता यावर अंतिम निर्णय थेट राज्य सरकार घेणार आहे.

रेशन दुकानदारांकडून ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांची यादी मागवण्यात आली आहे. या यादीतून दुबार नावे, मृत कार्डधारक आणि ई-केवायसी न केलेल्यांची नावे शिधापत्रिकेवरून वगळली जातील, असे संकेत अन्नधान्य वितरण विभागाकडून मिळत आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी पडताळणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे, ई-केवायसी न केलेले शिधापत्रिकाधारक बनावट ठरवले जाऊन त्यांना धान्याचा लाभ मिळणार नाही.

ऑल महाराष्ट्र फेअर प्राइज शॉपकीपर फेडरेशनचे खजिनदार विजय गुप्ता यांनी नागरिकांना लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. काही नागरिकांना बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचे स्कॅनिंग होण्यास तांत्रिक अडचणी येत असल्यास, त्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून आपले नाव वगळले जाणार नाही याची खात्री करून घ्यावी.वेळेत ई-केवायसी पूर्ण करून धान्याच्या लाभापासून वंचित राहण्याचे टाळा!

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे