महिला आता सातबारा उताऱ्यावर सहहिस्सेदार; ‘लक्ष्मी मुक्ती’ योजनेमुळे महिलांचे सक्षमीकरण!

Laxmi Mukti Yojana, Empower Women
'लक्ष्मी मुक्ती' योजनेमुळे महिलांचे सक्षमीकरण;

Laxmi Mukti Yojana, Empower Women: आता राज्यातील महिलांना शेती-मालमत्तेत समान हक्क मिळणार आहे! राज्य शासनाच्या ‘लक्ष्मी मुक्ती’ योजनेमुळे पतीच्या नावावरील शेतजमिनीवर पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून विनामूल्य नोंदवण्याची ऐतिहासिक तरतूद उपलब्ध झाली आहे. यामुळे महिला केवळ कुटुंबाचा भाग न राहता, थेट आर्थिक निर्णय प्रक्रियेत आणि कृषी संबंधित लाभांमध्ये सक्रिय सहभागी होऊ शकणार आहेत.

महाराष्ट्र महसूल व वन विभागाच्या १५ सप्टेंबर १९९२ च्या परिपत्रकानुसार, पतीच्या हयातीतच वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये महिलेचे नाव पतीच्या सातबारा उताऱ्यावर नोंदवण्याची कायदेशीर तरतूद आहे. ‘लक्ष्मी मुक्ती’ योजनेमुळे याच तरतुदीला अधिक बळ मिळाले आहे. पिंपरी-चिंचवडचे तहसीलदार जयराज देशमुख यांनी या योजनेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “या योजनेद्वारे महिलांना सहहिस्सेदार म्हणून नाव लावण्यात येत आहे आणि यासाठी कोणताही खर्च येणार नाही. यासाठी नागरिकांनी आपल्या स्थानिक तहसील कार्यालयात किंवा गावातील तलाठी यांच्याशी संपर्क साधावा.”

या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना शेती-मालमत्तेत समान अधिकार प्रदान करून त्यांचे सक्षमीकरण करणे हा आहे. अनेकदा महिलांच्या नावावर कोणतीही मालमत्ता नसल्याने त्यांना विमा, कर्ज यांसारख्या महत्त्वाच्या सुविधांपासून वंचित राहावे लागत होते. मात्र, या योजनेमुळे आता त्यांच्या नावावर जमिनीचा हक्क मिळाल्याने त्या आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होतील.

कसा घ्याल या योजनेचा लाभ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पती-पत्नींना काही आवश्यक कागदपत्रांसह संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे अर्ज सादर करावा लागेल. यासाठी पती व पत्नीचा संयुक्त अर्ज, सातबारा व ८-अ उतारा, आधार कार्ड, रेशन कार्ड प्रत, विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि अधिकृत पत्नी असल्याचा पोलीस पाटील यांचा दाखला ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही नाव नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे. यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क किंवा इतर कोणताही आर्थिक बोजा नागरिकांवर लावला जात नाही. पुनावळेचे माजी सरपंच लक्ष्मण मोहिते यांनी या योजनेचे फायदे विशद करताना सांगितले की, “जमिनीचा सहहक्क मिळाल्यास महिला आर्थिक निर्णय प्रक्रियेत अधिक सक्रिय होतील. बँक व बचत गटांकडून कर्ज, अनुदान, विमा योजना, कृषी यंत्रांसाठीच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठीही त्या पात्र ठरतील.”

या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा होणार असून, त्या खऱ्या अर्थाने सक्षम बनतील अशी अपेक्षा आहे. आपल्या पत्नीचे नाव सातबारा उताऱ्यावर सहहिस्सेदार म्हणून लावून तुम्हीही या महत्त्वाच्या योजनेचा लाभ घेऊ शकता.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे